Shravan Maasachi mahati-2

श्रावण मासाची महंती भाग - २

Shravan-Maasachi-mahati-5

श्रावण मासाच्या पहिल्या भागात आपण पौराणिक, अध्यात्मिक, कथा, व भौतिक स्तरावर श्रावण मासाची महंती व माहिती पहिली.  श्रावण मासाची महंती व माहितीचा लेख मोठा होत असल्याने दोन भागात विभागला आहे. भाग दोन मध्ये आपण या पुढील माहिती नेसर्गिक, सांस्कृतिक, आणि  वैज्ञानिक दृष्टया याचे काय महत्व आहे ते  जाणून घेऊया.

Shravan-Maasachi-mahati-6

"श्रावणमासी हर्षमानसी हिरवालदाटे चोहीकडे 

क्षणात येति सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे"


या दोन ओळीच्या कवितेतुन बालकवींनी केलेली कविता तर आठवतेच शिवाय श्रावणातील संपूर्ण निसर्गचित्र डोळ्यासमोर उभे राहते. कवी त्र्यंबक बापूजी ठुमरे म्हणजेच बालकवी ठुमरे ज्यांनी निसर्गाचे वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलं ते बालकवी त्यांच्यामुळे आपल्याला कळलं कि निसर्ग किती सुंदर आहे. श्रावण मासाची सुंदर वर्णन अनेक कवींनी केले आहे पण आपल्या बालपणापासून  मनामध्ये आतपर्यंत रुजलेली बालकवींची हीच कविता आहे.अर्थातच श्रावण मासी. 

निसर्गातील झालेला बदल व त्यामुळे जाणवणारे परिणाम यामुळे सुद्धा या श्रावण मसाला विशेष महत्व आहे. या महिन्यात सर्वत्र पाऊस पडून सगळीकडे हिरवळ पसरलेली असते झाडांना फुले फुललेली असतात आपण जर उंच डोंगरावरून पाहिलेतर आपल्याला असे दिसून येईल कि या धरतीमातेच्या अंगावर जणू हिरवीगार शालच पांघरली आहे आणि पिवळ्या, लाल, नारंगी फुलांनी त्यावर सुंदर नक्षीकाम केलं आहे. असे मनोहर मन मोहून टाकणारे विलोभनीय दृश्य पहान मन किती प्रसन्न होते हे सांगण्यासाठी किंवा याचे वर्णन करण्यासाठी आपल्याला पण कवीच व्हावं लागेल पण हे दृश्य पाहून आलेला अनुभव आपल्या स्मरणात कायम राहतो आणि तो अनुभव पुन्हा पाहण्यासाठी मन या श्रावण मासाची आतुरतेने वाट पाहत असते. हीच उसुक्ता आपल्याला निसर्गाचं वेड लावते.

Shravan-Maasachi-mahati-7

श्रावण महिन्यात निसर्गामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडून शेतकरी म्हणजेच बळीराजाची पेरणीची कामे आटोपलेली असतात आणि पाऊस पण चांगल्या प्रकारे पर्जन्य वर्षाव  करून स्थिरावलेला असतो. कधी पावसाची जोराची सर तर कधी हळुवार शिवार तर कधी तिरपी धार आणि काही वेळा ऊन पाऊस यांचा खेळच सुरु असतो. नद्या, नाले, ओढे भरभरून वाहतात असतात. धरणांमध्ये सुद्धा मुबलक असा पाण्याचा साठा वर्षभरासाठी उपलब्ध झालेला असतो. सर्वत्र अल्लाददायक वातावरण पसरलेल असत. रस्त्याच्या कडेला छोट्याछोट्या झुडुपातून लाल, पिवळी, नारंगी, निळसर रंगाची विविध फुल सुध्दा मन प्रसन्न करतात. नागमोड्या वाटेवरून जाताना मधेच एखादा पाण्याचं झरा आणि त्यातून खळखळ करत वाहणारा ओहळ, मधेच कुठे उंचावरून पडणारा पंधरा शुभ्र धबधबा आणि त्यातून उडणारे तुषार, मध्येच मोकळ्या माळावर गेल्यावर दिसणारे इंद्रधनुष्य असा निसर्ग पाहून मनमोहून जाते.


Shravan-Maasachi-mahati-8

तसेच हा महिना प्रजननाचा काळ सुद्धा आहे. सर्वत्र पाऊस पडून जमिनी वरील घाण, रोगजंतू, किटके हे पाण्यावाटे दूषित पाणी नदी, नाले, समुद्रामध्ये जाते, ते मासे खातात व त्यामुळे आपण जर मांसाहार केला तर आपल्याला सुद्धा आजारपण येण्याची शक्यता असते हे एक कारण जरी असले तरी या दिवसामध्ये आपल्या पोटातील पचनक्रिया थोडीशी मंदावलेली असते त्यामुळे मांसाहार वगळता शाकाहार करणेच योग्य आहे असे पूर्वी पासून सांगिले जाते व तसे आपण अनुभवले सुद्धा असेल. तसेच पावसाळ्यात समुद्र उधाणलेला असतो कोळीबांधवांच्या जीविताला कोणता धोका होऊ नये म्हणून मासेमारी बंद असते आणि याच काळात मासे प्रजनन करण्याचा कार्य करीत असतात. आपल्या पूर्वजांनी आपली जीवन शैली अश्या प्रकारे स्थापित केली आहे याचे हे एक चांगले उदाहरण आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये सर्व गोष्टीचा मेळ तंतोतंत जुळत आहे.


Shravan-Maasachi-mahati-9

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे इथे अजूनही ७०% लोक शेती व्यवसाय करतात व त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.आणि जवळजवळ भारतात होणारी शेती हि पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. बळीराजाची शेतावरील काम जवळपास झालेली असतात. त्यामुळे बळीराजाकडे पुरेसा वेळ उपलब्ध असतो त्यावेळेत भगवंताचे नामस्मरण करून आपण कष्टाने व मेहनतीने  उगवलेल्या शेतात चांगले पीक यावं या साठी श्रावण मासात बळिराजा आणि इतर भाविक देवी देवतांची पूजा प्रार्थना करतात. या महिन्यात देवाचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्व आहे.  


Shravan-Maasachi-mahati-14

पूर्वी पासून आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिपोस्तसावं साजरा करून दुसऱ्या दिवसापासून चातुर्मासातील श्रावण मासाची सुरुवात होते. या मासातील रविवार ते शनिवार या सर्व दिवशी वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना श्री महादेवाचा प्रिय महिना असल्याने दर सोमवारी महादेवाची पूजा केली जाते पण त्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते कारण श्री गणेश देवाला तसे वरदान प्राप्त आहे कोणतीही पूजा प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे पूजन केल्याने पुढे केलेली पूजा सफल होते व इच्छित फलप्राप्ती होते. श्री शंकराच्या पिंडीची म्हणजेच शिवलिंगची पूजा केली जाते. यादिवशी शिवलिंगावर रूद्राभिषेक केला जातो प्रथमतः शिवलिंगास स्वछ पाण्याची आंघोळ घातली जाते नंतर दूध, दही, मध, तूप व साखर एकत्र करून पंचामृत बनवून त्यांनी आंघोळ घातली जाते नंतर परत पाण्याने आंघोळ घालून चंदनाचा लेप लावतात. शिवलिंगावर कुंकू लावले जात नाही अभीर अर्पण केले जाते तसेच बेलपत्र, सुगंधी फुल, धोतऱ्याचे फुल अर्पण केले जाते. हे करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचे उचारण केले जाते.


Shravan-Maasachi-mahati-15

सोमवारी श्री महादेवाच्या पूजेच्या दिवशी उपवास केला जातो त्या दिवशी अल्पसा फलाहार करून महादेवाची उपासना केली जाते संस्कृत भाषेत उपवासाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, जवळ + राहणे यादिवशी भगवंताच्या जवळ राहणे असा आहे.  संध्याकाळी महादेवाला दिवाबत्ती करून गोडाचा नेवेद्य दाखवून उपासक केळीच्या पानावर जेवण करून उपवास सोडतात. जो व्यक्ती फक्त  श्रावणातील सोमवारी उपवास करून शिवलिंगची पूजा करून मनोभावे महादेवाचे चिंतन करतो त्याला बाराही मासातील सर्व सोमवारच्या पूजनाचे पुण्यफलाची प्राप्ती होते. तसे शास्त्रीय कारणानुसार पाहिले  तर उपवास करणे आपल्या स्वस्थासाठी सुद्धा गुणकारी आहे. या दिवसामध्ये आपल्या शरीराची पचन क्रिया थोडी मंदावलेली असते तेव्हा या दिवसामध्ये अल्पोहार करणेच उत्तम आहे असे सुचविले गेले आहे. इथे सुद्धा शास्त्र आणि स्वास्थ याचा मेळ आपल्याला पाहायला मिळतो.


Shravan-Maasachi-mahati-10


श्रावण मासात सोमवार प्रमाणे शनिवारची सुद्धा उपासना केली जाते. जे भाविक श्रावण मास पाळतात म्हणजेच जे उपासक असतात ते श्रावणातील सोमवार आणि शनिवारची उपासना करतात. असे बोलले जाते की ज्यांना शनी च्या अवकृपेपासून दूर राहायचे आहे ते शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी देवाला शरण जाऊन आम्हाला आपल्या अवकृपेपासून दुर ठेवणाची प्रार्थना करतात तसेच सोबत हा दिवस रुद्रावतार श्री हनुमंताचा देखील असल्याने आपल्याला बुद्धी आणि शक्ती प्राप्त व्हावी यासाठी मारुती रायाची उपासना करतात. 

श्रावण मासात नववधूच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे मंगळवारी  मंगळागौरीचे पूजन, प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचे पूजन केला जाते. यानिमित्त सर्व स्त्रिया एकत्र येऊन रात्रभर झीम्मा,  फुगडी, हुकणेघेणे असे वेगवेगळे खेळ करून  देवीचे जागरण करतात. नववधू सुद्धा घरातील अन्नपूर्णाच असते. घरातील माताभगिनींना त्याच्या कलागुणांना वाव मिळावा व सौसारातील रहाट गाड्यातून थोडी मोकळीक मिळावी, करमणूक व्हावी आणि मनसोक्त खेळता यावं सोबत त्याचा उत्साह वाढून आरोग्य चांगलं राहावं असा विविध  गोष्टीचा विचार करून आपल्या पूर्वजांनी या व्रताचं प्रयोजन  केले आहे. हा सण प्रथम वर्षी आपल्या माहेरी करून पुढील पाच वर्ष सासरी करून  त्याचे उध्यापन केले जाते.

Shravan-Maasachi-mahati-16

श्रावण मासाच्या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला नागदेवता आपल्या पूर्वजांचा, कुळाचे, घाऱ्याण्याचा रक्षणकर्ता आहे म्हणून या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवसाला नागपंचमीचा सण म्हणतात. हा सण घराघरामध्ये साजरा केला जातो कोकणात अशी रीत आहे कि जे भद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी दिवशी गणपती पूजन करतात ते नागपंचमीच्या पूजा आवश्य करतात. सकाळी नागदेवतेची मूर्ती घरी आणून त्याची पूजा करून दूध आणि लाह्यांचा नेवेद्य केला जातो. यादिवशी स्रिया स्वयंपाकात तळणे, भाजणे याप्रकारचे जेवण शिजवत नाही व पुरुष मंडळी जमिनीवर कुदळ मारत नाही हे पुर्वी पासूनची रीत आहे. यासर्व नियमाचे पालन करिन हा सण साजरा केला जातो. आणि सायंकाळी त्याचे झाडेझुडपांमध्ये स्थलांतर केले जाते तर काही जण गणपती सोबत त्याचे विसर्जन करतात.

Shravan-Maasachi-mahati-11

त्यानंतर श्रावण पौर्णिमेला नारळीपोर्णिमेचा सण कोळी बांधव आणि इतर लोकसुद्धा हा सण साजरा करतात. कोळी बांधवांचा उधरनिर्वाह पूर्णपणे सागरावर अवलंबून असल्याने हा सण त्यांच्यासाठी फार मोठा आणि महत्वाचा आहे. कारण पावसाळा सुरूहोण्याच्या आधीपासून कोळीबांधव आपल्या होडया किनाऱ्यावर आणून ठेवतात पावसाळ्यात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने आणि मास्यांचा प्रजनन काळ सुरु असतो यामुळे मासेमारी होत नाही या पौर्णिमीच्या दिवशी कोळीबांधवाचा पूर्ण परिवार स्त्रीया, मुली, मुलं आणि गावातील जनसमुदाय नटूनथटून मोठ्या हौसेने, आनंदाने सागरदेवाल श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करतात. आम्ही मासेमारीसाठी सुरुवात करीत आहोत हे सागर देवता  तू माझे व माझ्या होडीचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते तसेच  कोळी स्त्रिया आपल्या पतीच्या रक्षणासाठी सागरदेवाला गाराणे घालून प्रार्थना करतात. यादिवशी नारळाचे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जातात जसे कि नारळी पाक, नारळीभात, इत्यादी. या सणा निम्मित कोळीबांधवाची तरुण मंडळी नारळ फोडाफोडीचा खेळ खेळतात. स्त्रिया, मुली विविध खेळ खेळून आणि नृत्य करून पारंपरिक पद्धतीने नारळीपौर्णिमा हा सण साजरी करतात.

Shravan-Maasachi-mahati-12

याच श्रावण पौर्णिमेला नारळीपोर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देऊन तिचा सन्मान करतो हा सण बहीण भावाचे एक अतूट नात्याची स्मृती मनामध्ये कायम राहावी व बंधुकडून आपल्या बहिणीची रक्षा व्हावी हा सुद्धा यामागचा हेतू समजला जातो. हा सण पूर्ण भारत देशामध्ये व देशाबाहेर जेथे हिंदू समाजाचे लोक पसरलेले आहेत ते सर्व साजरा करतात. 

श्रावण कृष्ण सप्तमीला श्री कृष्ण प्रतिमेची पूजा केली जाते व  रात्री बारा वाजता श्री कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रात्रभर भजन, कीर्तन, जागरण करून घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो व दुसऱ्या दिवशी दहीकाला करून कृष्णाष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाने मथुरेत लहानपणी आपल्या सोबत बाळगोपाळांना घेऊन माखन चोरी कशी केली त्याप्रमाणे बाळगोपाळ  खेळ करून  दहिहंडी फोडून उत्सव साजरा करतात. या दिवशी माता आपल्या लहान बाळांना  श्रीकृष्णा प्रमाणे नटवून  वेशभूषा  करून त्याचे ओक्षण करतात. आता या सणाला मोठया प्रमाणावर व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याने शासनाकडून त्यावर काही निर्णायक बंधने घालण्यात आली आहेत तरी देखील हा उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो.   शैव असो कि वैष्णव शाक्त किंवा गाणपत्य असा सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत असा हा श्रावण महिना आहे. 

श्रावण मासाच्या अमावस्याच्या दिवशी पिठोरी देवीची पूजा केली जाते या आमवस्याला पिठोरी अमावस्या किंवा दर्भग्रहणी अमावास्या असे म्हणतात. या दिवशी नेवेद्याला पीठाचेच सर्व प्रकार करतात बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिटोरीचा खास नेवेद्य आहे. पिठोरीच दुसरं नाव मातृ दिन वंशवृद्धी, मुलांच्या सुख, समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजाकेली जाते.


Shravan-Maasachi-mahati-13
यादिवशी श्रावण मासाच्या आमावसेच्या बैलपोळा हा सण सुध्दा साजरा केला जातो हा सण मुख्यतः महाराष्ट्रात आणि कर्नाटकात व जवळपासच्या काही राज्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला पोळा किंवा बैलपोळा असे म्हणतात तर दक्षिण महाराष्ट्रात या सणाला बेंदूर किंवा बेंडर म्हणतात व कर्नाटकात या सणाला काहुर्रनावी म्हणतात. बळीराजा आपल्या सोबत शेतात राबणाऱ्या सर्जा राजा म्हणजे  बैलाला त्याच्या योगदानाला त्याच्या प्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निम्मिताने यादिवशी आपल्या बैलाची पूजा करतो. यादिवशी त्याच्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही. सर्व प्रथम त्याला आंघोळ घालून त्याला सजवून त्याचे पूजन तसेच ओक्षण करून त्याला गोड अन्नाचा म्हणजेच पुरणपोळीचा नेवेद्य दिला जातो. सायंकाळी गावातून सर्वजण आपल्या बैलाला घेऊन त्याची मिरवणूक काढतात. अश्या प्रकारे बैलपोळाचा सण साजरा केला जातो.

अश्या प्रकारे आपण श्रावण मासातील साजरे केले जाणारे सण आणि धार्मिक परंपरेनुसार श्रावण मासाची उपासना कश्या प्रकारे केली जाते हे पहिले तसेच श्रावणमास भौतिक परिस्थिती मुळे आणि शास्त्रीय दृष्टीने मानवाच्या जीवनात याचे किती महत्व आहे हे सुध्दा पहिले. यावरून आपल्या पूर्वजांनी किती सखोल अभ्यास करून या सर्व गोष्टीचा मेळ घडवून श्रावण मासाची महंती आणि त्याचे महत्व हिंदु धर्मासाठी एक वरदानच आहे असे सर्वाना ज्ञात करून दिले आणि ते आपल्याला सुध्दा हे मान्य करावेच लागेल.

आपल्या हिंदु धर्माच्या सणाच्या रीती आता बदलत्या काळामुळे हळू हळू  बदलत चालल्या आहेत. हा बद्दल असाच होत राहिला तर पुढील काळात या सणांना वेगळेच स्वरूप प्राप्त होईल व श्रावण मासातील पूजापाठ  आणि सणाची मूळ संकल्पना मागे पडून वेगळ्या रीती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या सणाची प्रथा पारंपरिक पद्धतीनेच साजरी करून येणाऱ्या पिढीला त्याची कारणे आणि महत्व याचे योग्य मार्दर्शन करून आपल्या हिंदू धर्माच्या सणाचे पावित्र्य जतन केले पाहिजे.

श्रावण मासाची शक्य होईल तेवढी माहिती दोन भागामध्ये विभागून आपणापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत केला आहे. आपण आपल्या आप्तजनांना, मित्रपरिवाराला आणि इतर मंडळींना या पवित्र श्रावण मासाची महंती पाठवून आपल्या कडून सत्कार्य घडून यावे हीच सद्धीच्या. यात कोणती माहिती देण्याचे राहिले असेल तर आपण कमेंट करून सूचित करावे.

धन्यवाद !!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर
Previous Post
Next Post
Related Posts

0 comments:

Please do not enter any spam link in the Comment