Shravan Maasachi mahati-1

श्रावण मासाची महंती भाग - १  


Shravan-Maasachi-mahati-1

"सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा"


गाण्याच्या या ओळींमध्ये दोन प्रेमी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना निसर्गातील होणाऱ्या जादूमय बदलाचे वर्णन करून मनातील ओढ निसर्गाच्या कृतीतून व्यक्त करताना जाणवत आहेत. श्रावण मासात निसर्ग बहरत असतो,  फुलत असतो, मन फुलपाखरासारखे इकडून तिकडे बागडत असते, कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी ऊनपाऊस एकत्र असा हा खेळ सुरु असतो आणि त्यात सुंदर असे इंद्रधनुष्य हे पाहत असताना  कधी आपण नकळत निसर्गाच्या मोहात गुंतत जातो आपल्याला कळत देखील नाही.

आपल्या भारत देशामध्ये श्रावण महिन्याला फार महत्व आहे. भारतात पुरातन काळापासून चालत आलेली हिंदु धर्माची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्याला या निम्मिताने पाहावयास मिळते. या महिन्यात होणारे पूजापाठ, व्रत, सण, उत्सव, आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याला खूप महत्व आहे. श्रावण मासाचे महत्व सांगणारे बऱ्याच पौराणिक, अध्यात्मिक, कथा, भौतिक, सांस्कृतिक, नेसर्गिक, वैज्ञानिक, वैशिष्ट्ये, अशी वेगवेगळी कारणे आणि संधर्भ आहेत. आपण सर्व दृष्टिने जरी पडताळून पहिले आणि सर्वांची वेगवेगळी करणे व संदर्भ असले तरी श्रावण मासाचे अलौकिक महात्म्याचे आणि पावित्र्याचे महत्वच आपल्याला दिसून येते. पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या रीती प्रमाणे आपल्या रूढी परंपरे नुसार श्रावण मास साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येकानी आपआपल्या पद्धतीने श्रावण महिन्याचे महत्व आणि पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.  

आपल्या हिंदु महिन्याची नावे हि विविध नक्षत्राच्या नवावरूनच  नावारूपास आली आहेत. जसे की चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख, जेष्ठा वरून जेष्ठ, पूर्वाषाढा वरून आषाढ, तसेच श्रवण नक्षत्रावरून श्रावण हे नाव आलेलं आहे. कारण या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून हा महिना श्रावण या नावाने ओळखला जातो. श्रावण महिना हा भारतातील हिंदू धर्माच्या पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना आहे. तसेच या महिन्यापासून चातुरमासाची सुरुवात होते. चातुर्मासातील हा महिना अतिशय शुभ असा महिना मानला गेलेला आहे. या चातुर्मासात श्रावण, भाद्रपत, आश्विन आणि कार्तिक हे चारही महिन्यांचे धार्मिक द्रुष्ट्या खूप महत्व आहे.

Shravan-Maasachi-mahati-2

श्रावण मास या बद्दल सांगायचे झाले तर श्रावण मास हा महिना श्री महादेवाचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात मुख्यतः प्रामुख्याने श्री महादेवाची उपासना केली जाते पण श्रावण मास फक्त महादेवाचा पूजेचा आहे असं नाही तर बाकी पूर्ण महिन्यातील प्रत्येक दिवस म्हणजे ठराविक वाराला पुज्यनीय देवी देवतांचे व्रत, आराधना आणि त्याची उपासना करण्यासाठी नियोजित केला गेलेला आहे. यामासातील प्रत्येक दिवसाचे त्या देवी, देवतांचे मनोभावे पूजन केल्याने इच्छानुसार लवकरच फलप्राप्ती होते असे सांगितले जाते.

स्कंदपुराणातील माहितीनुसार एकदा प्रतिभाशाली ब्रह्मपुत्र सनदकुमार यांनी धर्माला जाणून घेण्याच्या इच्छेने परमभक्तीने ईशवर, भगवान श्री महादेवाची स्थुती व प्रार्थना करून विचारणा केली कि हे देवा महादेवा आम्ही तुझ्या कडून विविध आणि अनेक प्रकारच्या व्रत, पूजापाठ भक्तीच्या मार्गाचे श्रवण केले आहे. तरी सुद्धा आम्हाला अजून काही जाणून घेण्याची मनामध्ये एक अभिलाषा आहे. बारा हि मासामधील सर्वात श्रेष्ठ आणि आपली अत्यंत प्रीती निर्माण करणारा असा कोणता महिना आहे. आणि सर्व कर्माचे सिद्ध फळदेणारा व इतर महिन्यात केलेलं कर्म जर या मासात केले तर तो अनंतकाळ फळ देणारा आहे. अश्या मासाबद्दल सांगण्याची कृपा करावी. तेव्हा श्री महादेव आपल्या भक्ताला सनदकुमार याला म्हणाले, मी तुझ्या कडून केलेल्या स्तुतीने आणि भक्तिनभावनेच्या प्रार्थनेने अतंत्य प्रसन्न आहे. हे सोब्रत हे विधीनंदन तुला अत्यंत गोपनीय अश्या व्रता बद्दल सांगतो ते तु लक्ष्य पूर्वक ऐक, बाराही मासातील सर्व मासा मधील मला श्रावण मास अत्यंत प्रिय आहे. याचे महत्व ऐकणे तसेस समजणे फार महत्वाचे आहे.

Shravan-Maasachi-mahati-3

या मासात श्रवण नक्षत्र युक्त पौर्णिमा असते म्हणून या महिन्याला श्रावण मास म्हटले जाते यामासातील महंतीचे श्रवण केल्याने सुद्धा मनाची शुद्धी होते यासाठी हा मास श्रावण सानिध्यवाला आहे. निर्मळ गुणांमुळे हा आकाशाप्रमाणे निरभ्र आहे म्हणून याला नभा असे सुद्धा म्हटलं गेल आहे. या श्रावण मासाच्या धर्माची गणना करण्यासाठी यापृथ्वीवर असा कोण समर्थ आहे ज्याच्या फलप्राप्तीच्या संपूर्णपणे वर्णन करण्यासाठी स्वतः ब्रम्हादेव आणि फलप्राप्तीचा महिमा बघण्यासाठी इंद्रदेव हजार नेत्रांनी युक्त झाले आहेत तसेच फलप्राप्तीचा महिमा सांगण्यासाठी शेषनाग आपल्या दोन हजार जिभेनी संपन्न झाले आहेत यापुढे अजून सांगण्याचे काय प्रयोजन आहे. याचे महत्व बघण्यासाठी आणि सांगण्यासाठी या सृष्टी मध्ये कोणीही समर्थ नाही आहे. हे मुनी अन्य मास यामासाच्या एका कलेला सुद्धा प्राप्त होऊ शकत नाहीत. हा मास सर्व व्रत, व धर्मानी युक्त आहे. या महीन्यातला एक सुद्धा दिवस व्रतरहित दिसून येत नाही. या मासात सर्व तिथी व्रत युक्त आहेत. या मासाच्या संदर्भामध्ये मी जे सांगत आहे ते केवळ प्रशंसा करण्यापुरते नव्हे तर आर्तो, जिज्ञासू, भक्तगण अर्थाची कामना करणाऱ्या मोक्षची अभिलाषा ठेवणारे आणि आपापल्या इच्छित प्राप्तीसाठी चारही प्रकारच्या लोकांसाठी ब्रह्मचर्य, बृहस्त, वानप्रस्थ, आश्रमातील संन्याशी यांनी या श्रावणात अश्या व्रताला अनुष्टान आणि विधिपूर्वक केल्याने मनुष्य पृथ्वीतलावरील आणि परलोकातील सर्व सुविधा त्याला सहजच उपलब्ध होतात व अंततः सांसारिक जीवनातून मोक्ष प्राप्ती होते. अश्या प्रकारे श्री महादेवांनी ब्रह्मपुत्र सनदकुमार याला श्रावण मासाचे व्रत, पूजापाठ, उपासना या बाबतची सर्व माहिती व त्याचे महत्व आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती समजावून सांगितले.

Shravan-Maasachi-mahati-4

जेव्हा सर्व देव आणि दानव यांनी एकत्र येऊन सागर मंथन केले होते तेव्हा त्यातून वेगवेगळी रत्न बाहेर आली होती पण अमृत प्राप्त होण्याच्या आधी त्यातून विष बाहेर आले त्या विषाने संपूर्ण  विश्वात हाहाकार मातला तेव्हा विश्वाच्या रक्षणासाठी ते हालाहल विष  श्री महादेवांनी विष पिऊन त्याला आपल्या कंठामध्ये स्थिरावून घेतले त्यामुळे त्याचे शरीर काळेनिळे झाले तेव्हापासून महादेवाला नीलकंठ असे नाव प्रचलित झाले. ज्यादिवशी महादेवाने विष आपल्या कंठामध्ये स्थिरावून घेतले, म्हणजेच धारण केले तो दिवस त्रयोदिशीचा होता म्हणून त्यादिवसाला सुद्धा प्रदोष, म्हणतात शिवपुजनामध्ये प्रदोषचा विशेष महत्व आहे.

श्री देवी माता पार्वतीने सुद्धा श्री महादेवाशी विवाह बद्ध होण्यासाठी श्रावण मासात श्री महादेवाची उपासना व  घोर तपश्चर्या  करून श्री महादेवाला प्रसन्न करून आपली इच्छा पूर्ण केली. यामुळे सुद्धा श्रावण मसाला विशिष्ट असे महत्व प्राप्त झाले. तेव्हा पासून ज्या मुलींना लग्नास उपवर योग्य वर मिळावा किंवा मुलीच्या लग्ना समंधीच्या सर्व समस्या दूर व्हाव्या यासाठी दर सोमवारी श्री महादेवाची पूजापाठ व उपासना करतात. 

श्रावण मासाच्या पहिल्या भागात आपण पौराणिक, अध्यात्मिक, कथा, व भौतिक स्तरावर श्रावण मासाची महंती व माहिती पहिली.  श्रावण मासाची महंती व माहितीचा लेख मोठा होत असल्याने दोन भागात विभागला आहे. भाग दोन मध्ये आपण या पुढील माहिती नेसर्गिक, सांस्कृतिक, आणि  वैज्ञानिक दृष्टया याचे काय महत्व आहे ते  जाणून घेऊया.


Shravan-Maasachi-mahati-5

अश्या प्रकारे आपण श्रावण मासातील धार्मिक परंपरेनुसार श्रावण मासाची उपासना कश्या प्रकारे केली जाते हे पहिले तसेच श्रावण मासाची महंती आणि त्याचे महत्व हिंदु धर्मासाठी एक वरदानच आहे असे आपल्याला सुध्दा हे मान्य करावेच लागेल.

आपल्या हिंदु धर्माच्या पूजापाठच्या रीती आता बदलत्या काळामुळे हळू हळू  बदलत चालल्या आहेत. हा बद्दल असाच होत राहिला तर पुढील काळात या पद्धतीना वेगळेच स्वरूप प्राप्त होईल व श्रावण मासातील पूजापाठ  आणि पारंपरिक मूळ संकल्पना मागे पडून वेगळ्या रीती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या हिंदु धर्माची प्रथा पारंपरिक पद्धतीनेच करून येणाऱ्या पिढीला त्याची कारणे आणि महत्व याचे योग्य मार्दर्शन करून आपल्या हिंदू धर्माचे पावित्र्य जतन केले पाहिजे. 

श्रावण मासाची शक्य होईल तेवढी माहिती पहिल्या भागात आपणापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत केला आहे. आपण आपल्या आप्तजनांना, मित्रपरिवाराला आणि इतर मंडळींना या पवित्र श्रावण मासाची महंती पाठवून आपल्या कडून सत्कार्य घडून यावे हीच सद्धीच्या. यात कोणती माहिती देण्याचे राहिले असेल तर आपण कमेंट करून सूचित करावे.



धन्यवाद !!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर


Previous Post
Next Post
Related Posts

0 comments:

Please do not enter any spam link in the Comment