“एक कप चहा”...!! घेणार की “एक कटींग चाय”...!!
“एक कप चहा”...!! घेणार की “एक कटींग चाय”...!! असे जेव्हा आपण बोलतो किंवा ऐकतो तेव्हा एक वेगळीच स्पुर्ती आपल्या जाणवते, चहा आपल्या रोजच्या जीवनामध्ये असा काही रुळलेला आहे कि, आपण कोणत्याना कोणत्या कारणाने त्याच्याशी जोडले गेलेलो आहोत आणि हे आपण नाकारू शकत नाही, इतकच काय तर चहा शिवाय काहींची सकाळ होत नाही, बेड टी घेतल्या शिवाय बिछाण्यातून उठून बाहेर येत नाहीत, कुणाचा चहा घेतल्या शिवाय आळस जात नाही तर काहींना चहा घेतल्यावरच तरतरी येत, काहींना तर काम करीत असताना स्फूर्ती येण्यासाठी एक कटिंग चाय चांगल्या प्रकारे स्टार्टअपचे काम करते, कुणी सवय म्हणून चहा पितो तर कुणाचा वेळ घालवण्यासाठी चहा पितो, काहीजण तर या चहाचे इतके चाहते आहेत कि त्यांना चहा पिण्यासाठी काहीतरी निम्मित असले की पुरे आणि ज्यांना काही निम्मित असण्याची पण गरज वाटत नाही असेही बरीच मंडळी आहेत, काही माणसं तर अक्षरशः चहाच्या आहारी गेलेली आहेत. असं जरी या चहा बद्दल लोकांचे विचार किंवा त्याबद्दलची लोकप्रियता असली तरी चहाची महिमा काय न्यारीच आहे बॉ…!! काहींना तर चहा पिताना सूर्रर्रर्र....!! आवाज करत चहा पितात यावरून त्याची चहा पिण्याची आवड किती आहे हे कळून येते.
आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पाहुणचार करताना प्रथम थंड घेणार कि गरम किंवा चहा घेणार कि कॉफी घेणार असे आवर्जून विचारतोच हि जरी एक औपचारिकता असली तरी ती आपली एक संस्कृती किंवा परंपरा, रीत होऊन गेली आहे पण काही असले तरी या चहाच्या निम्मिताने खाण्यापिण्याची चर्चा मात्र होतेच आपण बोलता बोलता सहजच असे बोलून हि जातो काय मंडळी चहापाणी काय घेणार किंवा झाली का चहापाणी असे विचारण्याची रीत सुद्धा प्रचलित आहे आता या चहापाणी शब्दामध्ये बरच काही गुपित असत हे हि आपल्याला माहित आहे
चहाच्या निम्मिताने का होईना बहुतेक चांगल्या गोष्टींना सुरुवात होते काही नवीन विचारांना मार्ग मिळाला आहे. या ऐका चहाच्या सोबत खूप काही विषय बोलले जातात, ठरले जातात, चर्चा संवाद होतात, देणे घेण्याच्या गोष्टी चहा घेता घेता ठरल्या जातात, वादविवाद मिटवले जातात, विचारांची देवाणघेवाण, रागरुसवे, दोस्ती यारी, दुनियादारी, राजकारण, भ्रष्टाचार आणि बरच काही चहापाणीच्या नावाने चहा घेताघेता केल्या जातात हे तर आपल्याला माहीतच आहे.
अशी चहा पिण्याची अनेक कारणे असली तरी त्या आता आपल्या सवयी बनून गेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला मान्य करायला हवे. ज्या घरात एकत्र बसून जेव्हा चहा घेतात तेव्हा एकमेकांना परस्परांशी जोडून घेणारी एक संस्कृती निर्माण झाली आहे त्या निम्मिताने एकत्र येऊन बसने आणि बोलणे होत असते त्या गरम पाण्याच्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी हि संस्कृती व संवाद सुरू करून देणारी परंपरा रूढ होत गेली आहे, जसा थांबलेला संवाद पुढे नेण्याचे कार्य चहाच्या निम्मिताने होत असले तरी त्याबरोबर आदी पासून सुरु असलेली रीत व परंपरा एका अनुभवाच्या पद्धतीने सुसंवाद आणखी थोडं पुढे नेणारी संस्कृती निर्माण झालेली आहे. एका अर्थानं त्या एका लहानशा चहाच्या पेल्यात भलंमोठं जग व्यापलंय, किंवा जग जोडलंय असे म्हटले तरी ते वावगं ठरणार नाही. दोन व्यक्तीच्या मनातले विचार आणि भावना एकमेकांसमोर एकाच ठिकाणी व्यक्त होण्यास एक कप चहा किती पुरेपूर आहे याची कैक उदाहरण आपण पहिली असतील किंवा ऐकिवात असतील.
तसेच आपण जेव्हा चहा बद्दल कितीही बोलत असलो तरी चहा सोबत विषय कॉफीचा आल्या शिवाय राहत नाही, कॉफी सुध्दा चहा प्रमाणेच तितकीच लोकप्रिय आहे. आपण बहुतेक जण चहा घेणारे असलो तरी आपल्यातलाच कुणी एक कॉफीचा चाहता असतोच मग त्याच्यासाठी वेगळी कॉफीची ऑर्डर असतेच. आपण वरील लिखाणात जे काही आपण चहा बद्दल वाचले तसेच जवळजवळ बरच काही कॉफी बद्दल हि तसच काहीसं आहे असं म्हणण्यास हरकत नाही, चहा आणि कॉफी हा प्रत्येकाच्या वयक्तिक आवडीचा असला तरी ती पिण्यामागची संकल्पना सारखीच असेल हे सांगता येत नाही, कुणाला कोणत्या वेळी काय घ्यायला आवडेल तो सुद्धा त्याच्या आवडीवर अवलंबून आहे. तसा कॉफ़ीचाही मोठा चाहता वर्ग आहे तरी सुद्धा तुलनात्मक दृष्टीने पहिले तर कॉफी पेक्षा चहा हि जास्त आपल्याला रुळलेली आहे असे दिसून येते हे ही आपल्याला मान्य करावे लागेल.
चहा आणि कॉफी हे दोन्ही हि पेय आपल्या आवडीचे आहेत आणि आपल्या भारत देशातील निम्म्या पेक्षा जास्त लोक चहा व कॉफी पितात मी तर म्हणेन फार कमी लोक असतील ते चहा व कॉफी पित नसतील साधारण दहा जणांपैकी सात आठ जण तरी चहा किंवा कॉफी पिणारी मिळतील. चहा कि कॉफी हे आपल्या दैनंदिन जीवनात काही अश्या प्रकारे रुळली आहे कि आपला दिवस सुद्धा याच्या शिवाय सुरु होत नाही म्हणजे चहा, कॉफी घेतल्या शिवाय कामाला सुरुवात होत नाही हे एक वेगळाच समीकरण झालेलं आहे. चहा व कॉफी पिणारे काही जण नेहमीची सवय म्हणून पितात, काही जण ठराविक वेळेतच पितात आणि काहींना तर याचे व्यसन असल्या प्रमाणे पितच असतात. प्रत्येकाने चहा व कॉफीला आपापल्या पद्धतीने त्याचे महत्व ठरविले आहे. त्याच बरोबर कोण चहाचा चाहता आहे तर कोण कॉफीचा.
विषय चहाच चाललाच आहे तर थोडं त्याचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया कि का चहा हि इतकी लोकप्रिय आहे. तासा चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले आहेत. इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील ॲमॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे ’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द यूरोपात नेला. इंग्रजी भाषेत सुमारे अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.
मुळात आपल्या भारत देशाचा विचार केला तर चहाला अंदाजे 200 ते 300 वर्षांचा इतिहास असल्याचे मानलं जाते. चहाचा मूळ उगम कोठे झाला? तसेच चहाच्या मूलस्थाना विषयी पुष्कळ दंतकथा आहेत व याबाबत बरीच वेगवेगळी मत आहेत. चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी ते तसे नाही, त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तपूर्व 2737 मध्ये शेन नुंग हा चीनचा तेव्हाचा सम्राट होता. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. दक्षिण चीनच्या दुर्गम भागात असताना एकदा तो एका औषधी वनस्पती असलेल्या झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्यामुळे पाण्याचा रंग आणि चवही बदलली. शेन नुंगला ते पाणी पिल्यामुळे त्याला एकदम तरतरी आली. त्याला ती चव खूप आवडली. पुढे त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी पिण्याची सवयच लावून घेतली. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या परिसरात त्या रोपांचा शोध घेतला. हीच रोपे चहाची रोपे म्हणून नावारूपास आली आणि आजच्या चहाचा जन्म झाला.
जगाचा विचार केला तर चीन आणि त्यानंतर भारत या देशांमध्ये चहाला प्राचीन इतिहास आहे. इतिहासाच्या दृष्टीने पहिले तर चीन या देशात चहाचा शोध लागल्याचे मानले जाते. चीन आणि भारतात प्राचीन काळापासून चहाचा व्यापार होत होता असेही सांगितले जाते. असे असले तरी चीनच्या लोकांचे आवडते पेय असलेला चहा आपल्या भारत देशात पोहचण्यासाठी ब्रिटीश साम्राज्य कारणीभूत असल्याचे इतिहासकार सांगतात. चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खर्या अर्थाने चहाचा परिचय झाला. जेव्हा इंग्रजांनी चहाची लागवड भारतात करून त्याचे उत्पादन केले आणि ब्रिटिशांनी व्यापाराच्या उद्देशाने जगाचा प्रवास सुरू केला तेव्हा ते प्रत्येक देशातील संस्कृती, तेथील जीवनमानाचा अभ्यास जवळून करत असत.
ब्रिटिश व्यापारासाठी भारतात आल्यावर त्यांनी शेजारील चीनची संस्कृती, तेथील लोकांची जीवनपद्धती देखील जाणून घेतली. तेव्हा ब्रिटिशांना चहाची माहिती झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी चहाच्या बाबतीत बरचंकाही उपाययोजना राबवून चहासाठी योग्य वातावरणाची निवड करून चांगल्या प्रकारे उद्पादन घेत गेले आज त्यांनी केलेले प्रयत्न भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने फळाला आलेत असे म्हणायला हरकत नाही. ब्रिटीश भारत सोडून गेले. परंतु, त्यांनी भारतात आणलेला चहा मात्र येथेच राहिला आणि आज तोच चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे ज्याचा खूप मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. तसेच चहा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग बनलेला आहे. चहा सोबत मोठ्याप्रमाणावर कॉफीचे ही उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते. मोठं मोठे उद्योजक, कंपन्या या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला नफा मिळविताना दिसतात. भारतातील चहाचे काही लोकप्रिय प्रकार आसाम टी, दार्जिलिंग टी, कांगडा टी, निलगिरी टी असे आहेत. तसेच भारतात उत्पादित होणारी चहा, कॉफीची निर्यात देश विदेशात मोठ्या प्रमाणावर होते आणि भारतातील काही कंपन्यांची उत्पादित केलेली चहा, कॉफीची मागणी जगभरात आहे. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.
जसा चहाचा इतिहास आहे तसा कॉफीचा देखील इतिहास आहे आणि कॉफी सुद्धा आपल्या आयुष्याशी चहा प्रमाणेच रुळली गेलेली आहे. एका नात्याप्रमाणे परंपरे नुसार ती संस्कृती बनत चालली आहे. कॉफी एखाद्या संध्याकाळी रोमांचित करून अंगावर शहारे आणणाऱ्या पावसाळी वातावरणत घेतलेला कॉफीचा घोट आंनद देणारा काही वेगळाच अनुभव देऊन जातो, खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना काही जुन्या आठवणी आठवतात तर काही नवीन गोष्टी घडतात आणि त्यात निसर्गसौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू एक विलक्षण अनुभव सतत आपल्या आठवणीत राहिली जाते... तो पाऊस आणि कॉफी, जसा कि तो आणि ती जेव्हा पहिल्यांदा डेट ला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी आणि तो अस्मर्णीय पहिला वाहिला सहवास किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत ग्यालेरीत बसून मनसोक्तपणे कॉफीचा घेतलेला आस्वाद मनाला एक वेगळेच समाधान देऊन जातो, मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची धुंद नशा यावी आणि कॉफी सोबत त्या गाण्यात रमून जाऊन गाण्याच्या स्वरात सोबत आपले स्वर मिसळून जसा गाण्याचा आनंद घेतला जातो तशी कॉफीच्या घोटात मिळणारी ती धुंदी काही औरच आहे. कधी पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत करणारी कॉफीची खासियत काही वेगळीच आहे. एखद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती पण मस्त गरमा-गरम कॉफी आणि सोबत चविष्ट केकच्या स्लाईस असेल तर, क्या बात है !!
कॉफीचा आणि पिणाऱ्यांचा अंदाजच काही इतरांन पेक्षा थोडा काय, बराच वेगळा आहे. हा चहा सोबत एकाच स्वयंपाक घरात असला तरी त्याचा रुबाब तितकाच नवाबी किंवा एका जेंटलमॅन सारखाच आहे आणि कॉफीचे सेवन करणारे पण तसेच स्टाईलिश असल्या सारखे दिसतील, तसं तुम्हीं बरेच ठिकाणी पाहिलं ही असेल किंवा आपण ही त्यापैकीच एक असाल हेही सांगता येत नाही.
तसा कॉफीच्या इतिहासाबाबत सांगायचं झालंच तर कॉफी ही कॉफीया झाडाच्या बेरीज / फळापासून मिळणार्या बियांपासून बनवली जाते. कॉफीचा जन्म असे म्हणतात की नवव्या शतकात इथिओपिआमध्ये झाला. काल्डि नामक मेंढपाळ होता त्याच्या असे लक्षात आले की त्याचा बकर्या कसल्याश्या झाडाच्या बेरीज खाऊन इतक्या प्रफुल्लित व्हायच्या की त्या रात्रीच्या झोपायच्याच नाही. जेव्हा काल्डीने स्वतः त्या बेरीज खाल्ल्या तेव्हा तो ही प्रफुल्लित झाला. एका भिख्खूने काल्डिला आनंदाने नाचताना पाहिले, त्याला विचारताच काल्डिने त्याला बेरीज दाखवल्या. त्या भिख्खूने त्या बेरीजपासून पेय बनवून प्राशन केले, त्यानंतर त्याला असे जाणवले की या पेयाने त्याला बराच वेळ जागते ठेवले. अर्थात हे असे मानले जाते. इथिओपिआमध्ये त्याकाळी कॉफीची पाने पाण्यात उकळवून मिश्रण तयार केले जाई, त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ते प्राशन केले जाई. कॉफीची प्रसिद्धी हळू-हळू अनेक ठिकाणी पोहोचली.
त्यानंतर पंधराव्या शतकात अरब लोकांनी कॉफीचा शोध लावला येमेनमध्ये. त्यांनी नुसता शोधचं नाही तर कॉफीचा व्यापार ही केला. १५५५ साली सुल्तान सुलेमानच्या राज्यात इस्तंबुलमधे कॉफीची ओळख सरवांना Özdemir Pasha ने करवून दिली. तो येमेनचा ऑट्टोमन राज्यपाल होता. ऑट्टोमन राजवाड्यात कॉफी बनवण्याची नवीन पद्धत सुरु झाली होती, ती पद्धत आज जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. कॉफीच्या बिया आधी भाजून घेतल्या जाई आणि मग त्याची पूड करुन पाण्यात अगदी मंदाग्नीवर उकळले जाई जेणेकरुन कॉफीचा अर्क त्यात उतरत असे. या ब्रुईंग पद्धतीमुळे कॉफीची किर्ती दूरवर पसरली. कॉफीच्या बिया इथिओपिआमधून येमेनला व्यापारी निर्यात करत असे. सोळाव्या शतकापर्यंत पर्शिया, इजिप्त, सिरीयात कॉफी पोहोचली होती. कॉफीला "वाईन ऑफ अरेबी" असे म्हटले जायचे. अरबस्थानात कॉफीला काहवा म्हणून ओळखले जाते. काहवा म्हणजे बलवर्धक.
पुढे एकोणीसाव्या शतकापर्यंत कॉफी जगभरात पोहोचली. कॉफीचे उत्पादन उष्ण प्रदेशात होते. कॉफीचे साधारण छोटे झाड किंवा झुडुप असतं. कॉफीचे दोन प्रकार असतात एक कॉफी अरेबिका आणि दुसरी कॉफी रोबस्टा. कॉफीच्या झुडपाची तिरपी पाने असतात आणि त्याला येणारी चेरीसारखी फळं लाल-जांभळ्या रंगाची, क्वचित पिवळ्या रंगाची असतात त्याला कॉफी चेरी असे ही म्हटले जाते. भारतात कॉफी अरेबिका आणि कॉफी रोबस्टा कर्नाटकात - कोदग्गु, चिक्कामंग्ळूरू, हस्सन मध्ये उगवली जाते, केरळमध्ये मलाबार येथे तर तामिळनाडूत नीलगीरी, कोडाईकनाल येथे याच उत्पादन घेतले जाते. पूर्वी कॉफीमध्ये गोडव्यासाठी साखरेऐवजी गुळाचा किंवा मधाचा वापर दक्षिण भारतात केला जाई. अश्या प्रकारे कॉफी भारतात सुद्धा मुबलक प्रमाणात उत्पादित केली जाते आणि निर्यात देखील केली जाते.
असा हा चहा आणि कॉफीच्या लेख लिहिताना सुवासिक सुगंधी वाफेचा सुगंधा सोबत चहा कॉफीचा घोट घेताना मनात आलेला एक मनोरंजक मिश्किल संवाद जी एक वेगळीच जुगलबंदी मनाला छेडून गेली कि चहा आणि कॉफीचा काहीतरी तोलामोलाचा संवाद झालाच तर कुणाचा कल कुठे असेल तर कुणाची आवड कुणासोबत असेल, कुणाला कोण जास्त जावळीचा वाटतो चहा कि कॉफी किंवा या दोघांची विशेषतः काय आहे, या दोघांना कोणत्या वेळी जास्त पसंद केलं गेलं आहे किंवा या दोन्ही ही आवडत असल्या तरी मग चहा कधी आणि कॉफी कधी याचाही फरक अगदी अदबीने किफायतशीर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला या चहा कॉफीच्या जुगलबंदीतुन अजून रंगात रंग वाढवून देईल एवढे मात्र नक्कीच सांगतो. हा प्रयत्न या अगोदर काहींनी केलाही आहे पण मी माझ्या अंदाजात शब्दाचा ताळमेळ बसवून लयबध्द केलेला प्रयास तुम्हाला चटकदार, रुचकर आणि मनोरंजक नक्कीच वाटेल. प्रत्येक वाक्य वाचताना तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळत जाईल आणि तुम्ही वाचता वाचता चहा, कॉफीच्या मोहात कधी पडालं हे तुम्हाला सुध्दा नाही कळणार. मग तुम्हीच विचारात पडाल "चहा घ्यावी कि कॉफी"...!!
चहा म्हणजे एक उत्साह…!!
कॉफी म्हणजे स्फूर्ती…!!
चहा म्हणजे मैत्रीत विनाकारण…
कॉफी म्हणजे प्रेम प्रकरण…!!
चहाची मजा कटींग मध्ये…!!
कॉफीची मजा सेटिंग मध्ये…!!
चहा म्हणजे कसमे वादे…!!
कॉफी म्हणजे उन वादो की यादे…
चहा म्हणजे आठवणींचा झरा…!!
कॉफी म्हणजे स्मृतीचा ओढा…!!
चहा म्हणजे उसळलेली लाट…!!
कॉफी म्हणजे फेसळलेली लाट…!!
चहा म्हणजे एकदम झटपट…!!
कॉफी म्हणजे अक्षरशः निवांत…!!
चहा म्हणजे धडपडीचे दिवस…!!
कॉफी म्हणजे स्थिरावलेली दिवस…!!
चहा म्हणजे प्रवासातला सोबती…!!
कॉफी म्हणजे ध्येयाची प्राप्ती…!!
चहा म्हणजे सावरण्याचा धीर…!!
कॉफी म्हणजे मायेचा आधार…!!
चहा म्हणजे एकदम झकास…!!
कॉफी म्हणजे वाह मस्त…!!
चहा म्हणजे व्यवहाराच्या अटी…!!
कॉफी म्हणजे प्रेमाच्या भेटी…!!
चहा म्हणजे बालपणापासून…!!
कॉफी म्हणजे तारुण्यात आल्यापासून…!!
चहा म्हणजेच शंभरात एक सारखाच…!!
कॉफी म्हणजे म्हणजे शंभरात एकच…!!
चहा म्हणजे आंदोलन करणारे…!!
कॉफी म्हणजे नेतृत्व करणारा…!!
चहा पाणी म्हणजे वरची कमाई…!!
कॉफी म्हणजे एक्सट्रा मलाई…!!
चहा म्हणजे वाह ताज…!!
कॉफी म्हणजे जी उस्ताद…!!
चहा म्हणजे कथा संग्रह…!!
कॉफी म्हणजे कादंबरी…!!
चहा नेहमी मंद दुपार नंतर…!!
कॉफी एक धुंद संध्याकाळी…!!
चहा चिंब पावसात भिजल्यावर…!!
कॉफी आकाशात ढग दाटून आल्यावर…!!
चहा म्हणजे एक दीर्घ चर्चा…!!
कॉफी म्हणजे निवांत संवाद…!!
चहा म्हणजे उत्स्फुरता…!!
कॉफी म्हणजे उत्कंठता…!!
चहा म्हणजे दुनियादारी…!!
कॉफी म्हणजे दिल की यारी…!!
चहा म्हणजे वर्तमानात दमल्यावर…!!
कॉफी म्हणजे भूतकाळात रमल्यावर…!!
चहा म्हणजे संगीताचा ताल…!!
कॉफी म्हणजे गाजलेची चाल…!!
चहा सोबत बटर खारी…!!
कॉफी सोबत विटा मारी…!!
चहा म्हणजे अद्रक इलायची का स्वाद…!!
कॉफी म्हणजे ब्रू, नेस्लेचा स्वाद…!!
चहा म्हणजे वाद विवाद…!!
कॉफी म्हणजे सुसंवाद…!!
चहा म्हणजे गरमा गरम…!!
कॉफी म्हणजे कॉफी विथ करण…!!
चहा म्हणजे चाहत…!!
कॉफी म्हणजे दिल की धड़कन…!!
चहा म्हणजे भविष्याची स्वप्ने…!!
कॉफी म्हणजे साकारलेली स्वप्ने…!!
चहा म्हणजे मित्राची मेहंफिल…!!
कॉफी म्हणजे प्रियसीचा फिल…!!
चहा म्हणजे टपरीचा राजा…!!
कॉफी म्हणजे कॅफेची राणी…!!
..............................................................................................................................................................
चाय हो या कॉफी के साथ.....
खूब निभाया है इन्होनें मेरा साथ.....!!
कभी ये बातो मे थे मेरे साथ.....
तो कभी यादो मे रहे मेरे साथ.....!!
जिंदागि के हर पल से जुडे रहे मेरे साथ.....
हर लम्हें मे गवाह बने हे मेरे साथ.....!!
मैने गुजारे है कही पल चाय के साथ.....
तो कभी बिताये है कुछ लम्हें कॉफी के साथ.....!!
ना कोई शिकवा है ना कोई शिकायत एक दुसरे के साथ.....
ये दोनो खूब समजते है मेरे हालात और जजबात.....!!
धन्यवाद...!!
लेखन : अर्जुन ना. वालावलकर
0 comments:
Please do not enter any spam link in the Comment